हरवल्या पायवाटा
जेव्हा नव्हत्या इंधन गाड्या
तेव्हा गांव जरी खेडे होता
पायाखालच्या पायवाटेला
लाल तांबडा रंग होता
वार्यासोबत झुलत्या झाडांना
मातीचा गंध होता
सापशिडी वळणाच्या
झाडी, झुडपातील
कांटाकुट्यातील पायवाटा
तुडवण्यात आनंद होता
साकवारुन मिरवतांना
खळखळणारे ओढे
ओढ्यातल्या गारगोट्या
खेकडे,चिंबोऱ्या
निरखतांना कोस,मैलांचा
शीण जात होता
सड्यावरील कडे
कड्यावरील करवंदे
करवंदांची झुडुपे
वारूसंगे हेलावणारे
काळे निळे झुपके
तोंडी लावतांना
ओठी लाली रंगत होती
वृक्ष छायेस रूळलेल्या
दूरवर शीळ घालणाऱ्या
पक्षांची संगत होती
संतापणार्या उन्हांत
बरसत्या पावसात
घोंगडीचा निवारा
वस्त्रहीन अंगाला
हिंवाळा झोंबत नव्हता
माती माखल्या पावलांना
मायेचा स्पर्श होता
डोळ्याच्या पापण्या
अलगद मिटत होत्या
थकल्या असती वाटा
थकले नव्हते पाय.
पायाखालच्या वाटा
घराकडे वळत होत्या.
जेव्हा नव्हत्या इंधन गाड्या
तेव्हा गांव जरी खेडे होता
मधुकर जाधव