गावाकडे आता
आता गड्या गावाकडे
तश्शी मज्जाच राहीली नाही,
कारण गांवाकडे
काही गांवच राहिला नाही.
आरवणाऱ्या कोंबड्या पेक्षां,
मोबाईलचा टोन आहे.
आरवणारा कोंबडा,
सुस्त आणि मौन आहे.
पहाटे उठणारा भैरू,
आतां झोपूनच उठतोय.
जात्यावरलं गाणं,
चक्कीमध्ये कुटतंय.
गावामधे गुरं नाही,
गुरांच शेण नाही.
सडा सारवण करणाऱ्या
हातांना, शेणाचा गंध नाही.
माणसं बदलली,
जनावरं बदलली,
बदलले ऋतू,
बदलली हवा.
दिसेनासा झालाय,
निर्भय पांखराचा थवा.
सुकल्या झाडांना,
खतांचे डोस आहेत.
लगडल्या फळाफुलांत,
फ्रुटीचा डोस आहे.
जमीनीला कस नाही.
फळात रस नाही.
कल्टार शिवाय आम नाही.
हायब्रीड शिवाय बेण नाही.
सिझरींग शिवाय वीण नाही.
गाळणी शिवाय पीणं नाही.
आरामा शिवाय जीणं नाही.
आरोग्याच्या नावाने,
कोल्हेकुई आहे.
वैद्याच्या हाती,
इंजेक्शनची सुई आहे.
आधिकृत डाॕक्टरांची वाण आहे,
भोंदू सोदूंची शान आहे.
किर्तनांचा तमाशा आहे,
भोजनासाठी भजन आहे.
जंगलात हिंस्र प्राणी होते,
आता
माणुसच हिंस्र झाला आहे.
वृक्षांची कत्तल,
प्राण्यांची शिकार,
निर्वाहासाठी,त्यांच्यापाशी
हाच एक उपाय.
बुजल्या खाड्या,हरवली बंदरे
किनारी उभ्या उदास होड्या
हलवल्या बैलगाड्या
आल्या इंधनगाड्या
पायवाटा डांबरी झाल्या
तशी माणसेही डांबरट झाली
रस्ते गेले हायवे झाले
घरे गेली माड्या झाल्या
माड्या शेजारी,
गाड्या आल्या
गाड्यांच्या वर्दळीत
श्वास घुसमटतो आहे
ब्राॅय़लर शिवाय बेत नाही
चायनीज शिवाय खात नाही
बीसलरी शिवाय पीत नाही
गावात आणि शहरात
फरक तो काय
म्हणून शहराकडे
वळती पाय
तरीही खरे सांगू,
गड्या गावाकडे तश्शी
मजाच राहीली नाही.
असं,गड्यांनो म्हणु नका
गावाशी नातं तोडू नका
गाव होतं सोडलं,
निर्वाहासाठी
पण तुटलं ना,
नातं मातीशी
एव्हढं जरी समजून घ्याल
तर गाव आपला
म्हणवून घ्याल.
इस्टेटीसाठी भांडू नका,
हक्काच आपल्या सोडू नका
गावाशी आपले जन्माचे नाते
नाळ जोडली तोडू नका.
मधुकर जाधव