चिमणी
चिऊ ताई तू अंगणात यायची
आई तुला दाणे टाकायची…
इवल्याश्या चोचीत दाना घेऊन तू निघून जायची…
एकदा तू अशीच अंगणातून निघून गेली…
कळत नाही आहे, तू हरवली,
की आम्ही तुला गमावलं..
खरंच चिऊताई आम्ही काय कमावलं…
आम्ही तुलाच नाही तर आईला सुद्धा गमावलं..
आता तिच्या डोळ्यांनी दिसत नाही… फक्त डोळे पाणावतात…
जागतिक चिमणी दिवसाला आम्ही तुझी आठवण काढत असतो
तुझा खोपा तुझी पिल्ल,आता तुझ्या नावाने ट्विटर काढलं
प्रत्येक जण त्यावर
आपली मते मांडत राहतो..
कुणाची तरी उणी दुणी काढतो, तू फक्त नावाला राहिली…
तुझी आठवण आली की
गोफण घेतलेला बापही आठवतो…
तोही आता ओसरीत पडलेला असतो…
चिऊताई तू गेली अन् वैभव गेले..
आताशा आम्ही लहान मुलांना…
तुझ्या साठी पाणी ठेवायला सांगतो…
कारण
तुझी नदी आम्ही पिऊन टाकली…
माफ कर चिऊताई…
आता या ओंजळीत तांदळाचे दाणे नाहीत…
सहा इंची मोबाईल आहे…
तू संपली नाही आम्ही तुला संपवलं…
आमचं अपयश विकासाच्या
गढी खाली लपवलं…
सुरज खंडारे