तुही याद आल्या वरी
टीप टीप ही डोयाची..
तूही याद आल्यावरी..
तय हाता मंदी जीव,
त्याची तुह्या पास दोरी..
भेदरल्या कायजाचा
पुन्हा पुन्हा थरकाप..
मन टीचल तरी ही
सदा तूहा नाम जप..
अशी खुणावते वेडी
सखे तुही पायवाट..
बघ भरोनिया आला,
हृदयाचा काठ काठ..
जात तूही ग एगळी
माह्या कासावीस जीव..
रान तापलंया सारं
जणू ओलांडली शिव..
कसा गोंदला ग सये
तुह्या नाकावर राग..
मन हिंडते उनाड
सदा तुह्या मागो मागं
आता पुरे झाला सये
तुह्या रागाचा बहाणा..
रोज कितीदा मारते
कसा कसा तू टोमणा..
बघ वेडी झाली आता
काळीभोर चांदरात..
अन् काजळी चढली
झाली दिसेनाशी वात..
मन पाखरू पाखरू
त्याले तुहा ग सहारा..
कुशिमंदी माह्य मन
घालं त्याले गार वारा..
गार वाऱ्याने ग सखे
गोड मैफिल मांडली
तुहं नाव घेता घेता
बघ ओंजळ सांडली
ओंजळीच्या काठावरी
प्रेम आलंया भरून..
ओढ बघ ही भेटीची
नको जाऊस दुरून
ओठ गुलाबी हसते
त्यात डवरल्या सरी..
तय हाता मंदी जीव
त्याची तुह्या पास दोरी..
टीप टीप ही डोयाची
तूही याद आल्या वरी..
टीप टीप ही डोयाची
तूही याद आल्या वरी
तूही याद आल्या वरी.
सुरज खंडारे