नैवद्य

         वैशाख महिन्याचं उन बाहेर जाळून टाकणारा तीव्र दाह ओकत होतं..तरीही अक्षय तृतीयेला माय-माहेरी आलेल्या सासुरवाशीण लेकी आंबा-चिंचेच्या झाडांना बांधलेल्या झोक्यांवर हसत-खेळत.. “माझ्या माहेराचं बाई किती गाऊ गुणगान,लेक सासरी नांदते मनी जपते माहेराचं ध्यान..”अशी एकापेक्षा एक सुंदर गीते गात अक्षय तृतीयेच्या सणात मांगल्याचे मधुर क्षण पेरीत होत्या..त्या लेकी-बाळींचे सुमधुर स्वर ऐकून भागीरथी आईचे हृदय खूप गलबलले.तिच्या तिन्ही मुली सुगंधा,इंदु अनं प्रमिलाच्या आठवणीने तिची नयन सरिता वाहू लागली..प्रपंच अनं वाढत्या लेकरांच्या व्यापामुळे या वर्षाच्या अक्षय तृतीयेला त्या येऊ शकल्या नव्हत्या..भागाईच्या घरात अठराविश्व दारिद्रय नांदत होतं..ऊसाच्या पाचटाने शाकारलेल्या साध्या चंद्रमोळी झोपडीत ती दृष्टीने काहीसा अधु झालेला नवरा दौलत आप्पा अनं शेवटचं शेंडेफळ तिचा लहानगा मुलगा देवाला मायेच्या उबदार पंखाखाली वाढवून गरीबीचे दगडधोंडे भरलेल्या संसाराचे गाडे  ओढत होती..माळमाथ्याच्या अठ्ठावीस गुंठे शेतात दुष्काळ कोसळल्यामुळे यंदा जेमतेम तीनचं पोते गहू पिकलेले होते..एक पोते घरासाठी ठेवले व दोन पोते गहू विकून मजुरांच्या मजुरीचे पैसे,किराणा दुकानदाराची उधारी,काही हात उसने घेतलेले पैसे व्याजासहित ज्याच्या त्याच्या हाती सोपवून या वर्षासाठी तरी किमान ती कर्जमुक्त झाली होती..अक्षयतृतीयेच्या सणाच्या दिवशी अंगण ओटा झाडून भागिरथी आईने स्वयंपाकाची तयारी केली..तोपर्यंत दौला आप्पाने नथु कुंभाराकडुन विकत आणलेल्या मातीच्या घागरींवर आंबा,टरबूज व आंब्याची हिरवी पाने मांडून पुजेची तयारी करून ठेवली होती..भागिरथी आईने मग दाराच्या उंबरठ्याला पाण्यानं धुवून व चंदन लावून थोडासा कुंकू व हळद लाकडाच्या पंचपाळातुन घेऊन द्वार पुजले..अनं ओट्यावरूनच तिने देवाला जोरदार आरोळी दिली..

देवा..ये देवा..कुठे तरफडला रे तू ?

चंदू,संजू अनं जगूच्या संगतीत देवा गोट्या खेळत होता..

आईचा ग्राम पंचायतीच्या भोंग्यापेक्षाही मोठा आवाज येताच देवा हातातल्या गोट्या तिथेच टाकून वाऱ्याच्या वेगाने सुसाट धावत घरी आला..आईच्या पदराला घामेजलेले तोंड पुसता-पुसता त्याने विचारलं,”काय गं आई..कशाला बोलविलं गं मला ?

तानाजी न्हाव्याने कटींगच्या मशीनने खरडुन दिलेल्या देवाच्या माळरानासारख्या खुरट्या दिसणाऱ्या केसांच्या डोक्यावर हात फिरवून भागाई त्याला म्हटली,”जा माझ्या दादा.. हे एवढं नैवद्य राममंदीर,मारुतीचं देऊळ अनं नदीजवळच्या वीरदेवांना अनं माऊल्यांना थोडं-थोडं चढवून ये..

दौला आप्पाच्या जुन्या धोतराच्या पानातुन फाडलेल्या फडक्यात बांधलेले ताट एक हातात धरुन अनं दुसऱ्या हातात तांब्याच्या धातुचा पाणी भरलेला तांब्या घेऊन देवा अनवाणी पायांनी भरभर रस्त्यावर चालत होता..पायाला चटके तर खूपचं बसत होते..पण गरीबीचे चटके सहन करण्याची सवय पडलेल्या देवाला हे रस्त्याचे चटके तर क्षुल्लकच वाटत होते..रस्त्यावर भूकेमुळे त्याचं पोट रिकामं झालेले होते म्हणुन त्याने ताट-तांब्या खाली ठेवून कंबरेची ढिली झालेली खाकी चड्डी वर ओढून घेतली..तिच्यावर कंबरेचा काळा करदोरा चढवून त्याने जवळचं पडलेल्या काडीने चड्डी व्यवस्थित फिट करुन घेतली व तो पुन्हा रस्त्याला लागला..

नदीजवळच्या देवळाजवळ देवा आला तर तिथे भली मोठी आगगाडीच्या डब्यांसारखी लोकांची रांग लागलेली त्याला दिसली..जो-तो नैवद्य चढवून,नारळ फोडून,ओळखीच्या लोकांना प्रसाद वाटून घरी परतत होता..रांगेत उभ्या असलेल्या देवाचं अचानक पिंपळाजवळ बसलेल्या व देहानं कृश दिसणाऱ्या भिकाऱ्याकडे लक्ष गेलं..तो भूकेने कासावीस झालेला जीव विनवण्या करुन लोकांकडे खायला अन्न मागत होता पण कुणीही त्या पामराला ढुंकूनही पाहत नव्हतं..देवाने क्षणभर विचार केला..देवळातल्या देवापुढे खाण्याचा ढीग लागलेला होता पण तो काहीही खात नव्हता..मीही त्याच्यापुढे खायला ठेवलं तरी तो काहीच खाणार नाही..जेमतेम बारा वर्ष वयाचा देवा..त्याने सरळ रांग सोडून दिली व तो पिंपळाजवळ बसलेल्या त्या उपाशी म्हाताऱ्या भिकाऱ्यासमोर बसला..नैवद्याचं ताट तिथेचं त्याने मोकळे केले व त्या म्हाताऱ्या बाबाच्या हातात पुरणपोळी दिली व वाटीत भरलेल्या आंब्याच्या रसाबरोबर खाण्याचा त्याने त्याला आग्रह केला..ओशाळलेल्या नजरेने तो म्हातारा इकडे-तिकडे पाहत होता..त्याला भय वाटत होतं की  कुणी बोलणार तर नाही ना किंवा मारणार तर नाही ना !..रांगेत उभे असलेले लोक सर्व पहात होते..कुणी हसत होतं तर कुणी नाक मुरडत होतं..रांगेतलाच एक माणूस देवाकडे तुच्छतेने अंगुली निर्देश करुन बोलला,

कुणाचं आहे रे ! हे वेडपट कार्ट ?”

दुसरा लगेचं बोलला,”घोड्या माळच्या वस्तीमधलं वाटतं मला “तिसरा लगेचं देवाच्या मनाला जिव्हारी लागेल असे कटू बोलला,

नालायकाला रांगेत उभे राहण्याचा कंटाळा येत असेल..म्हणून त्या भुकाटलेल्या म्हातारड्याला खाऊ घालून हा मोकळा होत आहे..”एक बाई तर काट्यासारखं टोचून बोलली,”या आजकालच्या बावळटांना देवाधर्माच्या रिती भातीही कळत नाही गं बाई !” सगळे जहाल विषासारखे शब्द देवा निगरगट्ट बनून ऐकत होता..म्हाताऱ्या बाबाला पोटभर जेऊ घालून जेव्हा देवाने तांब्यातलं पाणी त्याला प्यायला दिले तेव्हा त्या उपाशी म्हाताऱ्या बाबाच्या डोळ्यात कृतज्ञतेने झऱ्यासारखी आसवे दाटून आली..रिकामं ताट देवा फडक्यात बांधून घरी परत जात नाही..तोपर्यंत वादळ वाऱ्यासारखी ही बातमी भागाईच्या कानापर्यंत आदळली गेली, कुणीतरी तिला सांगितले,”भागाई तुझ्या वेड्या देवाने देवळात नैवद्य न दाखवता रस्त्यातचं कुणाला तरी खाऊ घातलं..”शेजारची अहिल्या काकू भागाईला बोलली,” बाई ! तुझ्या पोराच्या डोक्यात फरक पडलेला आहे..एकतर त्याला चांगल्या डॉक्टरकडे दाखव नाही तर झिपरु भगताकडे जाऊन देवीजवळ त्याचा सुधरण्याचा कौल तरी माग..शेजारपाजारच्या बायांचे सारे पोथीपुराण भागाईने शांतपणे ऐकून घेतले..तिचे अंर्तमन ज्वालामुखीसारखे खदखदत होते.. तेवढ्यात देवा समोरुन आला..कोपऱ्यातचं पडलेल्या ओल्या ऊसाचे टिपरे तिने हातात घेतले दारात पाय टाकताच देवाला तिने रागाने खेकसून विचारले ,”का रे ! तुला मरीआई खाऊन जावो बावळटा..मी तुला सांगितलं होतं काय अनं तू मुर्खचाळे करुन आला काय रे बैला ? देवा काही सांगेल त्या अगोदरचं भागाईने त्याला ऊसाच्या टिपऱ्याने निळा-पिवळा होईपर्यंत बुकलून काढलं..देवा काकुळतीला येऊन गयावया करीत सांगत होता,”आई नको गं मारु मला ! माझं जरा ऐक तर खरं..पण भागाई काहीचं ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती..अनं देवाला बदडुन रागाच्या भरात शेवटी कोपऱ्यात ते ऊसाचं टिपरं तिने फेकून दिलं..तेवढ्यात दौला आप्पा गुरा-ढोरांना खळवाडीत चारा टाकून घरात आला..रडून-रडून थकलेला देवा फुसकतचं हुंदके देत होता..दौला आप्पा काय समजायचं ते समजला अनं देवाला म्हटला,”कशाला सणासुदीला बिनकामाचे उद्योग करीत बसतो रे वेड्या ? चल तोंड धू अनं दोन घास खाऊन घे..पण रागानं फुगलेला देवा पाय आपटतच देवघराच्या खोलीतच गोधडी टाकून आडवा झाला..तिथूनचं त्याने आईचे बोल ऐकले..भागाई दौला आप्पाला सांगत होती,”नका विनवण्या करु त्या टोणग्याच्या,तुम्हीचं मातवून ठेवला त्याला लाड करून-करून..बघते ना मीही किती उपाशी राहतो तो ते..? दौला आप्पा घास टाकून जेवण आटोपताच खळ्यात निघून गेला..भागाई ताट वाढून जेवायला तर बसली पण घास काही तिच्या नरड्यात टाकायची तिला इच्छा होईना..भरलेला ताट तिने तसाच झाकून दिला..अनं स्वतःच्या मनाला कोसत तशीच आतल्या आत धुमसत बसली..पाहता-पाहता दुपारचा तिसरा प्रहर होत आला..सकाळपासून मार खाऊन पडलेल्या उपाशी लेकराचा विचार करताच त्या माय-माऊलीचं हृदय गलबलुन आलं..देवघराच्या खोलीत रडून-रडून देवा झोपी गेला होता..टपटप गाळलेल्या आसवांचे ओघळ त्याच्या गालावर सुकलेल्या पापुद्रयासारखे स्पष्ट दिसत होते..त्याच्या पायाच्या पोटऱ्यांवर पडलेले काळेकुट्ट दिसणारे वळ तिच्या हृदयाला पीळ पाडत होते..भागाईच्या डोळ्यात ममतेचं आभाळ दाटून आले..ती गप्पकन तिथेचं खाली बसली..देवाच्या गालावर तर कधी पोटऱ्यांवर ती मायेने हात फिरवत होती..अर्धा जागा होऊन देवाने जेव्हा रागाने तिचा हात झटकून दिला तेव्हा भागाईच्या डोळ्यात घळाघळा अश्रू तरळून हुंदके दाटून आलेले होते..तिच्या धारोष्ण आसवांचे थेंब देवाच्या गालावर पडताच तो ताडकन उठला..आईचे भरलेले डोळे अनं रडवेली मुद्रा बघुन तो कावराबावरा झाला..आई रडता-रडता सांगत होती,”माझ्या सोन्या,माझ्याशी बोल ना रे बाळा..नको राग धरु रे ! मी तुला खूप मारलं ना ! म्हणून देव मला रडवत आहे..आईचे काळजाला भिडणारे शब्द ऐकून देवा ताडकन तिच्या गळ्याला बिलगला..अनं बोलला,”आई नको ना गं रडू..मला कसचं वाटतं..मी तुझी शपथ घेऊन सांगतो आई..मी रस्त्यावर कुणालाच खाऊ नाही घातलं..देवळाजवळ तो उपाशी म्हातारा बाबा दिसला तो भुकेने कळवळत होता मी त्यालाच खाऊ घातलं..लोकांजवळ तो खायला मागत होता पण लोक त्या देवळातल्या न खाणाऱ्या दगडाच्या देवापुढे अन्न वाढत होते..बाहेर कुत्र्यांनाही खाऊ घालत होते पण त्याला बिचाऱ्याला कुणी काहीच देत नव्हते..म्हणून मी त्याला जेऊ घातले..तुला माहित आहे का गं आई तो मला जेवणानंतर काय म्हटला ? तो बोलला “देव तुला आणि तुझ्या अन्नपूर्णा आईला सुखाचं अनं समृद्धीचं आयुष्य देवो..देवाचे हे कौतुकाचे बोल ऐकून भागाईच्या डोक्यावरचा दुःखाचा भार क्षणात हलका झाला..मायेने तिने त्याला कवेत उचलले त्याला स्नानगृहात बसवलं..त्याचे हातपाय,तोंड धुवून लुगड्याच्या पदराने त्याला पुसले..मांडीवर बसवून वात्सल्याने त्याचे पटापटा मुके घेतले..जेवणाचे ताट वाढले..ताटात आंबारस,पुरणपोळी,भजे, कुरडया,रस्सा-भात वाढुन स्वतःच्या हाताने घास भरवले..देवानेही जेव्हा रस-पुरणपोळीचा घास आपल्या चिमुकल्या हातात घेऊन भागाईच्या तोंडात भरविला तेव्हा तिचा उर भरुन आला व तिचे डोळेही पाणावले..कावराबावरा झालेल्या देवाने जेव्हा तिला विचारलं,”आई,का गं रडतेस ?..मी चुकलो का? गहिवरून भागाई बोलली, ”नाही रे ! माझ्या राज्या..चुकली तर मीच..आतापर्यंत जग मला सांगत होतं,”भागाई,तुझा हा देवा वेडा आहे..पण आज मला कळलं..”खरं तर माझा देवा शहाणा आहे अनं हे जगचं वेडं आहे..या भागिरथीच्या नशीबी आलेला तू साधा मुलगा नाही रे !..तू तर माझ्या पोटी आलेला साक्षात देवचं आहे माझ्या सोन्या ! खरं नैवद्य कुणाला अर्पण करावं हे जगाला शिकविणारा अनं स्वतः कृती करून दाखविणारा माणसाच्या रुपात आलेला खरा बाळमुंज्या देव..!

                                                                                                                                                        लेखक-देवदत्त बोरसे✍🏼