आणाभाका
दिला जेव्हा आपल्याच माणसाने, विश्वासाला धोका
कशाची प्रेम दिवाळी अन कशाच्या आणाभाका..
कितीही सांगा पटवूनी, मी हिरवा ना भगवा झेंडा..
घ्यायचे नसते समजून तेव्हा आपल्याच दिसतात चुका..
उखाण्यात नाव घेता घेता, ती दुसऱ्याची झाली,
तिला भेटला ताजमहाल अन् मला गवसला नाका..
इथे उन्हाने होळी होळी होते वावरात तान्हुल्याची,
त्यांना आमच्या झोपडीत दिसतो, सुंदरसा झरोका…
विरहाचे संगीत सजते, रात्री उशीच्या मांडीवरी,
आठवण येता सजनीची, चुकतो हृदयाचा ठोका..
केवढे हे पुण्य त्यांचे, आम्हा हिंदू मुस्लिम केले,
माणसात राहूनही माणूस वागेना माणसा सारखा..
सुरज खंडारे