लकिर [lakir]

लकिर

उसवल्या काळजाची,

सख्या आईची फिकीर..

बंद ओठामध्ये सदा

तुझ्या नावाची लकीर..

केलं निरागस प्रेम,

आता सांभाळते घर..

बघ हसते वरून

आत काळा झाला उर..

किती मारल्यास हाका

ऐकू आल्या वेशीवर..

तुझ्या आवाजाने सख्या,

शहारा पेशिवर..

सदा उचकी लागावी

असा आठवू नको रे..

भूतकाळाची वेदना,

मनी साठवू नको रे..

चार दिवसाचं प्रेम

उभ्या जलमी वेदना

कोरं फाटलं आभाळ

भंग पावली साधना

नको दोष देऊ सख्या

नको नाराजीत राहू..

माझ्या दिलाच्या पाखरा

नको गोंधळून जाऊ

सख्या जपतेया सारं

तुझ्या नावाची कहाणी

आता शिकार ठरली

तुझ्या मनाची रे राणी

असं उठते काहूरं

मन येते तुझ्या पाशी

कोवळ्या मिठी मध्ये

जाणीव खोटी खोटी

मन टीचलया सारं

गेले तडे जागोजाग

तुझं माझं रे भेटणं

वेड्या नशिबाचा भाग

सख्या सावरून घे रे

तप्त हुंदका आतला

तुझ्या आसवांच्या साठी

माझा पदर फाटला

तुझं घर खुणावते

वेडं दुरून दुरून

तुझं नाव घेता घेता

मन जाई रे झुरून

त्याच्या मिठी मध्ये आता

माझं गहाण आभाळ

तुझ्या डोळ्यात पाऊस

माझ्या मना मध्ये जाळ

येतो थकून भागून

मला पाहताच खुश

इतिहासाचा आपल्या

नाही त्याला मागमूस

सख्या डोरल्याच्या साठी

प्रेम माझं रे हारलं

माफी असू दे मैनेला

गोड असू दे कारलं

तुला मिळेल चांगली

आशा देवाकडे माझी

नीट काळजी घेईल

नको ठेऊस नाराजी

असा निरोपाच्या वेळी

करू नकोस घायाळ

आत वेदना गुंफली

सारं निस्तरेल काळ

तब्येतीला तू सांभाळ

तुझी हरणी निघते..

त्याची वात बनुनिया

सदा सदा मी विझते

तुझ्या कुशीचा गारवा

मन मोकळा रे श्वास

जपतेया सारं सारं

तुझी वेडी हे आभास

सदा टोचत राहते

सुन्या हृदयाची चिर

बंद ओठ मध्ये सदा

तुझ्या नावाची लकिर

                                सुरज खंडारे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: