क्रॉसचेक
आज दोघांच्या लग्नाचा वाढदिवस होता सातवा- आठवा असावा कदाचित, दोघेही सकाळी नेहमीपेक्षा लवकरच उठले , सगळं आवरून देवपूजा करुन चहा घेतला आजचा चहा जरा जास्तच गोड होता कारण त्याला गोडंच आवडतो म्हणून गोड बनला असावा, आदल्या दिवशी कामावरून येताना त्याने भरपूर दिवसांनी मोगर्याचा गजरा विकत आणला होता, आज तोच गजरा मी तूझ्या केसांत माळणार हा त्याचा हट्ट तिनेही अजिबात मोडला नाही, आणि दिवसाची सुरूवात अगदी स्वप्नातल्या सुखासारखी झाली,चहा पिऊन दोघंही जवळच्या गणपती मंदिरात श्रीगणरायाचं दर्शन घ्यायला गेले सकाळी लवकरच गेल्यामुळे एवढी गर्दी नव्हती त्यामुळे न ताठकळता बाप्पांचं दर्शन झालं , घरी आणायला शेजार्यांना द्यायला प्रसाद घेतला, मंदिराच्या बाजूला एक चांगली मिसळ मिळते दोघांनी गप्पा रंगवत मिसळपाववर ताव मारला , एरवी तसा शहारातल्या धावपळीत एकमेकांना द्यायला घ्यायला वेळ कमीच पडतो , आजचा संपूर्ण दिवस फक्त आपल्या दोघांचाच असं दोघांनीही आपल्या मनाला केव्हाच सांगून ठेवलं होतं, आणि त्याची खूणगाठ न सांगता दोघांच्या चेहऱ्यावर दिसत होती , नेहमी ड्रेसमध्ये वावरणारी ती आज ती त्याच्या आवडीची साडी नेसली होती त्यामुळे त्याच्या तिच्यावरच्या कौतुकाच्या मात्रा वाढल्या होत्या…या कौतुकाने दारातली तुळस आज नेहमीपेक्षा जास्त प्रसन्न झाली होती ,देव्हार्यातल्या अगरबत्तीचा सुगंध आज राखेतही दरवळत होता.
कौतुक ऐकता ऐकता तिच्या तोंडून सहज एक प्रश्न आला ,
आज गिफ्ट काय आणलं..? तो स्तब्ध आणि अनुत्तरित होऊन बॅगेतून चेक काढून तिच्या हातात दिला, खरंतर तो चेक त्याच्या पागाराचा होता आठ दिवस अगोदर मिळालेल्या पगाराचा चेक त्याने अजून बॅकेंत टाकला नव्हता , ऐक ना..! हा चेक प्रत्येक महिन्याला मीच टाकतो आज तूझ्या हाताने टाक बँकेत , ठीक आहे ती हसून म्हणाली ,
तिच्या हातावर त्याचं अवघं आयुष्य आहे हे त्याला ठाऊक असावं …
नात्याला अजून मजबूत करुन ताटातली मिसळ संपली , एका अतूट निर्मळ अशा नात्यांचं साक्षीदार होता आलं या आनंदात आज ते टेबल स्वतःचं कौतुक करत राहिलं अजून एका अशा साठवून ठेवण्यासारख्या क्षणांची वाट पाहंत…
पांडुरंग कोकरे