चंद्र असे प्रत्येकाचा
आकाशातील तो गोळा
पाहती नजरा त्या सोळा
चष्मा लावुनी कुणी पाहती
काढे अर्थ अनेक वेळा
लहानपणी ती छोट्यांची
त्यांचा असे चांदोमामा
घास मुखी भरवताना
येई आईच्या तो कामा
पुस्तक हाती घेताना
पाहे पचांग कुणीतरी
सण वार त्यावर विसंबूनी
असे केवळ त्याच्यावरी
प्रेमी युगालांचा तो लाडका
गाणे जेंव्हा गुणगुणतो
देण्यासाठी तो नजराणा
तोडून आणीन म्हणतो
शास्त्रज्ञांची कथा न्यारी
करतील केंव्हा तिथे स्वारी
पाय जेंव्हा ठेवतील तिथे
माहिती गोळा करतील सारी
साऱ्यांना हा भुरळ घाली
फोटोग्राफर व चित्रकार
मोह कुणाचा सुटत नाही
असो कोणताही कलाकार
मागे न राहे तेंव्हा कवी
कौतुकाचा घेई पुढाकार
खेळ खेळी तो शब्दांचा
त्यासी करी तो साकार
मेघा शहा